
पालघर | विशेष प्रतिनिधी
पालघर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या वेवूर–नवली उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उड्डाणपुलावर पुरेसे पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत काही असामाजिक घटकांचा वावर वाढत असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पथदिवे बसविण्यासह रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
उड्डाणपुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहने तसेच नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. विशेषतः पुलावरील अंधारामुळे अपघाताचा धोका निर्माण होण्याबरोबरच महिलांसह रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
अंधाराचा गैरफायदा घेत मद्यपान होत असल्याचा दावा
मनसेच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलावरील अंधाराचा गैरफायदा घेत काही व्यक्ती रात्रीच्या वेळी तेथे उघड्यावर मद्यपान करताना आढळून येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे परिसरात अनुचित प्रकारांना वाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ पथदिवे बसविणे पुरेसे नसून, रात्रीच्या वेळी पोलिसांची नियमित गस्त वाढविणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मनसेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कार्तिक मैत्राणी यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा
या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर उपशहर अध्यक्ष कार्तिक विलास मैत्राणी यांनी पुढाकार घेत संबंधित प्रशासकीय विभागांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
उड्डाणपुलावर तातडीने हायमास्ट किंवा उच्च क्षमतेचे पथदिवे बसवावेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी पालघर पोलिसांची विशेष गस्त सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या तक्रारीची प्रत पालघर जिल्हाधिकारी, पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच पालघर पोलीस ठाणे यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
‘दुर्घटनेनंतर जागे होऊ नका’
“पूर्व आणि पश्चिम पालघरला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची वर्दळ असतानाही येथे पुरेशी प्रकाशव्यवस्था नसणे ही गंभीर बाब आहे. अंधारामुळे एखादी अनुचित घटना किंवा अपघात घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा त्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा कार्तिक विलास मैत्राणी यांनी दिला आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे पालघरकरांचे लक्ष
उड्डाणपुलावरील पथदिव्यांचा प्रश्न केवळ प्रकाशव्यवस्थेपुरता मर्यादित नसून तो वाहतूक सुरक्षितता आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित असल्याने नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज आहे.
आता संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेऊन वेवूर–नवली उड्डाणपुलावर कायमस्वरूपी आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करणार का, तसेच रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
