
आनंद आश्रम प्राथमिक शाळा व विष्णूनगर येथील गरीब विद्यार्थ्यांना शाळोपयोगी साहित्याचे वाटप
पालघर | प्रतिनिधी :
गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बीज दत्ता वेल्फेअर असोसिएशन सामाजिक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आनंद आश्रम प्राथमिक शाळा, पालघर तसेच विष्णूनगर परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळोपयोगी वस्तू आणि सॉक्सचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वस्तू उपलब्ध करून देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला यंदा १४ वर्षे पूर्ण होत असून, सातत्याने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
रिपाईचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार संपूर्ण पालघर जिल्ह्यात बीज दत्ता वेल्फेअर असोसिएशन आणि रिपाईच्या वतीने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला रिपाईचे कार्यकर्ते दीपेश गायकवाड, संकेत वरठा, सुनील पाटील, दिपाली बोडके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आल्याने पालक व शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
या सामाजिक कार्यासाठी श्री. गोविंद सर, परीक्षित दांडेकर, रिगल बुकचे सुमित भाई आणि ईशी इंडस्ट्रीजचे शैलेश भाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविता येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी गेल्या १४ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, भविष्यातही जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.