
पालघर | प्रतिनिधी
पालघर, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : पालघर जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि त्रुटीविरहित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR-2026) सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, तसेच दुबार, अपात्र आणि स्थलांतरित मतदारांच्या नोंदींची नियमानुसार पडताळणी करून मतदार यादी अधिक विश्वासार्ह बनविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
BLO मार्फत घरोघरी जाऊन मतदार नोंदींची पडताळणी
मतदार यादीतील नोंदींची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन त्यांच्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. या प्रक्रियेत एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घेण्यावर विभागीय आयुक्तांनी भर दिला.
मतदार यादीतील चुकीच्या, दुबार किंवा नियमानुसार वगळणे आवश्यक असलेल्या नोंदींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करावी.
त्याचबरोबर पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांच्या BLA ची भूमिका महत्त्वाची
मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट्सनी (BLA) सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले. BLA यांनी क्षेत्रीय स्तरावर BLO यांच्याशी समन्वय साधून मतदार यादीतील त्रुटी, नावांचा समावेश, दुरुस्ती तसेच संबंधित दावे व हरकती निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
मतदार यादीची अचूकता ही निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास पुनरीक्षण प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पूर्ण होऊ शकते, असे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
नागरिकांनी स्वतःच्या मतदार नोंदी तपासाव्यात
मतदारांनीही केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःच्या मतदार नोंदींची खातरजमा करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय आणि जन्मतारीख यांसारख्या तपशिलांची तपासणी करावी. नोंदींमध्ये काही चूक आढळल्यास किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करून वेळेत आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक पुनरीक्षणाचे निर्देश
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण पालघर जिल्ह्यात पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक पद्धतीने करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग सुनिश्चित करणे आणि मतदार नोंदींबाबत नागरिकांचा विश्वास वाढविणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी प्रशासनाने दक्षतेने काम करावे, तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक असणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहणे, यासाठी SIR-2026 अंतर्गत प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिकांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.