विक्रमगडमध्ये ‘भगवान बिरसा कला संगम २.०’चा सांस्कृतिक जल्लोष; ८६४ आदिवासी कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग!

४ जिल्हे, १६ तालुके आणि १२७ गावांतील कलाकारांचा सहभाग; पारंपरिक नृत्य, संगीत, हस्तकला आणि वारली चित्रकलेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन

विक्रमगड | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील आदिवासी कला, संस्कृती आणि समृद्ध परंपरांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या महोत्सवाची कोकण विभागीय प्रादेशिक फेरी ३१ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात आदिवासी लोककलेचा अक्षरशः महासंगम अनुभवायला मिळाला. या सोहळ्याने विक्रमगडच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या विभागीय फेरीचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल ८६४ कलाकारांचा सहभाग! कोकण विभागातील ४ जिल्हे, १६ तालुके आणि १२७ गावांतील कलाकारांनी या स्पर्धेत आपली कला सादर केली. विक्रमगडमध्ये १ हजार २१० पेक्षा अधिक नागरिक, कलाप्रेमी आणि प्रेक्षकांनी उपस्थिती लावून कलाकारांचा उत्साह वाढवला. कोकणा, वारली, मल्हार कोळी, कातकरी, महादेव कोळी आणि ठाकूर अशा विविध आदिवासी समाजांच्या पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन या निमित्ताने घडले.

महोत्सवात गौराई नृत्य, ढोल नृत्य आणि ताळ नृत्य अशा पारंपरिक नृत्यप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. प्राचीन आख्यायिका, रूढी-परंपरा आणि आदिवासी जनजीवन यांचे प्रतिबिंब कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे उमटवले. संबळ वादन, ढोल वादन यांसह विविध पारंपरिक वाद्यांच्या ताल-सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हिरोबा देवाच्या गायन विधीने विशेष लक्ष वेधून घेतले. याशिवाय बोहाड्याचे पारंपरिक मुखवटे, बांबू व वेतापासून तयार केलेल्या वस्तू आणि विविध हस्तकलांचे प्रदर्शन आकर्षण ठरले. वारली चित्रकलेच्या माध्यमातून आदिवासी जीवनशैली, निसर्ग आणि परंपरांचे सुंदर चित्रण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपीचंद कदम (आयएएस, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे विभाग), विक्रमगडच्या पोलीस उपअधीक्षक निशा सोनवणे, पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा (प्रसिद्ध तारपा वादक) आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सावरा उपस्थित होते. मान्यवरांनी कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करत आदिवासी कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. राज्य समन्वय समितीचे काम रुपेश कोडीलकर यांनी पाहिले.

‘भगवान बिरसा कला संगम’, धरतीग्रामोन्नती सेवा संस्था आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील गुणवत्तेनुसार प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना २ हजार ५०० रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दोन कलाकारांना उत्तेजनार्थ विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. सहभागी सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

विक्रमगड येथील प्रादेशिक फेरीतून निवड झालेल्या कलाकारांना पुढील फेऱ्यांमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. १ नोव्हेंबर रोजी नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती येथे अन्य प्रादेशिक फेऱ्या पार पडणार आहेत. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी ‘जनजाती गौरव दिना’निमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने गडचिरोली येथे मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

आदिवासी कला ही केवळ मनोरंजनाची साधने नसून ती समाजाचा इतिहास, अस्मिता आणि संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. विक्रमगडमध्ये पार पडलेल्या या महोत्सवातून नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कलांचा अभिमान वाटावा आणि या सांस्कृतिक वारशाला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, हा महत्त्वपूर्ण संदेश अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button