पुस्तक परीक्षणाच्या व्हिडिओ स्पर्धेत विजेत्यांना ३ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके; महाराष्ट्रातील वाचकांना सहभागाचे आवाहन

पालघर | प्रतिनिधी
दिवाळीची सुट्टी म्हणजे आनंद, उत्साह आणि मनोरंजनाचा काळ! मात्र, याच सुट्टीचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी व्हावा, या उद्देशाने पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी वाचन पर्वणी!’ हा अनोखा वाचन आणि पुस्तक परीक्षण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटांमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीला चालना मिळावी आणि पुस्तकांमधील ज्ञान, विचार, सौंदर्य व अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील आपल्या आवडीचे पुस्तक वाचून त्याचे तीन ते चार मिनिटांचे व्हिडिओ स्वरूपात पुस्तक परीक्षण सादर करायचे आहे. विशेष म्हणजे, नोंदणी करणाऱ्या वाचकांना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून आपल्या आवडीची कोणतीही दोन पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
भरघोस पारितोषिकांसह प्रमाणपत्रांची संधी!
या स्पर्धेतील उत्कृष्ट पुस्तक परीक्षणांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १,००० रुपये, तर दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी स्पर्धक आणि विजेत्यांना प्रमाणपत्रेही प्रदान केली जाणार आहेत.
नोंदणी आणि व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९२२५९९६२८९ या WhatsApp किंवा संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी. पुस्तक परीक्षणाचा तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ १० डिसेंबर २०२६ पर्यंत sdsmlibraryreadbooks@gmail.com या ई-मेलवर किंवा वरील WhatsApp क्रमांकावर पाठवायचा आहे. व्हिडिओसोबत सहभागींची आवश्यक वैयक्तिक माहिती देणेही बंधनकारक आहे.
‘पुस्तकांच्या सहवासात सुट्टीचा प्रत्येक दिवस करूया खास!’
या प्रेरणादायी संदेशातून वाचनाची चळवळ महाराष्ट्रातील अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे. केवळ पुस्तक वाचणे नव्हे, तर त्यातील विचार समजून घेणे, स्वतःचे मत मांडणे आणि इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करणे, ही या उपक्रमाची खरी संकल्पना आहे, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केले.
दिवाळीच्या सुट्टीत मनोरंजनासोबतच ज्ञानाची शिदोरी मिळवून देणारा दांडेकर महाविद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच वाचनप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार असून, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.