गांधीनगरच्या रस्त्याचा अखेर मार्ग मोकळा! बंड्याभाऊंच्या पाठपुराव्याला यश; ५ कोटींच्या विकासकामाचा श्रीगणेशा!

पहिल्या टप्प्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर; दुसऱ्या टप्प्यात आणखी ३ कोटींची तरतूद – पाणी, समाजमंदिर, क्रीडांगण आणि रेल्वे सुविधांसाठीही विकासाचा धडाका!

पालघर | प्रतिनिधी

गांधीनगरमधील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या रस्त्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पावसाळ्यात चिखल-दलदलीतून वाट काढण्याची वेळ आणि रेल्वे पुलाकडून लांबचा वळसा घालण्याची नागरिकांची कसरत आता संपण्याची आशा निर्माण झाली आहे. नगरसेवक रवींद्र म्हात्रे ऊर्फ बंड्याभाऊ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, गांधीनगरमधील बहुप्रतीक्षित नवीन डीपी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

गांधीनगर परिसरात ये-जा करण्यासाठी थेट आणि सुस्थितीत रस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना वर्षानुवर्षे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याऐवजी चिखलातून मार्ग काढावा लागत होता. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन रवींद्र म्हात्रे यांनी नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

५ कोटींचा रस्ता; पहिल्या टप्प्यात २ कोटींची कामे सुरू!

या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उर्वरित दुसऱ्या टप्प्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गांधीनगरच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

रस्त्यापुरताच विकास नाही; पाणी आणि मूलभूत सुविधांनाही प्राधान्य!

भूमिपूजन सोहळ्यावेळी बोलताना बंड्याभाऊ म्हात्रे यांनी गांधीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या आगामी कामांची माहिती दिली. परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पूर्वीच्या १ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीऐवजी तब्बल ५ लाख लिटर क्षमतेची मोठी पाण्याची टाकी उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय परिसरात समाजमंदिर उभारणे आणि क्रीडांगण विकसित करण्याचा ठरावही मंजूर झाला असून, या जागेचे डिमार्केशन पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना (एस्केलेटर) तसेच डीएफसीसीच्या माध्यमातून पादचारी पूल (FOB) उभारण्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या भूमिपूजन सोहळ्याला नगराध्यक्ष उत्तम घरत, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका उज्ज्वला काळे, नगरसेवक राहुल पाटील, नगरसेविका प्रियंका म्हात्रे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि गांधीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने गांधीनगर परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आता केवळ भूमिपूजनापुरत्या मर्यादित नसून, मंजूर निधीनुसार रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्त्याबरोबरच पाणीपुरवठा, समाजमंदिर, क्रीडांगण आणि रेल्वे सुविधा या प्रस्तावित कामांनाही प्रत्यक्ष गती मिळाल्यास गांधीनगरच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

↑
error: Content is protected !!
Call Now Button