ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांचे परखड प्रतिपादन; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात साहित्यनिर्मिती प्रक्रियेची प्रकट मुलाखत रंगली

पालघर | प्रतिनिधी
“इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी मुले ही सोन्याच्या पिंजऱ्यातील पोपट असतात, तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले ही दऱ्याखोऱ्यांत मुक्तपणे विहरणारे गरुड असतात,” असे परखड मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय ही चूक असेल, तर निदान पुढील पिढीला तरी मराठी माध्यमातून शिक्षण देऊन ती सुधारण्याचा प्रयत्न पालकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीत विश्वास पाटील यांच्या साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा, संशोधनाची प्रक्रिया, प्रत्यक्ष अनुभवांचे महत्त्व आणि त्यांच्या समृद्ध लेखनविश्वाचा प्रवास उलगडला.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना विश्वास पाटील म्हणाले की, इंग्रजांना भारतात प्रवेश देणे ही आपली ऐतिहासिक चूक होती; मात्र स्वातंत्र्यलढ्यातून आपण त्यांना देशाबाहेर हाकलून दिले. त्याचप्रमाणे आजच्या पिढीला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून पुढील पिढीला मातृभाषेतून शिक्षण देण्याकडे पालकांनी वळले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला अधिक व्यापक संधी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी आपल्या पानिपत, झाडाझडती, पांगिरा, महानायक, धुपिया, द ग्रेट कांचना, चंद्रमुखी आणि आंबी यांसारख्या गाजलेल्या साहित्यकृतींच्या निर्मितीमागील रंजक प्रवास उलगडला. एखादी कादंबरी लिहिताना केवळ कल्पनाशक्ती पुरेशी नसून त्यासाठी सखोल संशोधन, प्रत्यक्ष अनुभवांचे संकलन, ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास, व्यक्ती आणि घटनांचे बारकाईने निरीक्षण आवश्यक असते, असे त्यांनी सांगितले. सनदी अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव, प्रशासनातील माणसे, सामाजिक वास्तव आणि विविध घटनांनी आपल्या लेखनाला कशा प्रकारे समृद्ध केले, याचेही त्यांनी मनमोकळेपणाने कथन केले.
जयू भाटकर यांनी अभ्यासपूर्ण आणि नेमक्या प्रश्नांच्या माध्यमातून मुलाखतीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. साहित्यनिर्मितीच्या पडद्यामागील प्रक्रिया जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी संवादात स्थान दिले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मुलाखत न राहता साहित्य, भाषा, शिक्षण आणि समाजभान यांचा समृद्ध संवाद ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या गौरवशाली शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा परिचय करून दिला. बुद्ध्यांकापेक्षा भावनांक अधिक महत्त्वाचा असून साहित्य माणसाचे भावनिक पोषण करते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी केले, तर प्रा. विवेक कुडू यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, उपाध्यक्ष रामकृष्ण दांडेकर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव अनिल पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनंत पाटील, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध साहित्यिक संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यप्रेमी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्यिक संवादाचा आनंद घेतला.
फोटो कॅप्शन : सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष सी. ए. सचिन कोरे, ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार जयू भाटकर, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव अनिल पाटील, प्राचार्य डॉ. किरण सावे आणि प्रा. विवेक कुडू.
