बस प्रवासात महिलेचे दागिने चोरी – पालघर पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत

पालघर : बस प्रवासादरम्यान एका ज्येष्ठ महिलेचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून, पालघर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तक्रारदार श्रीमती कुसुम सुंदर धनवाडे (वय 70 वर्षे), रा. सूरत (गुजरात), या 30 मार्च 2026 रोजी गुजरात परिवहन मंडळाच्या GJ 18 ZT 0461 या बसने सूरतहून महाडकडे प्रवास करत होत्या. रात्री सुमारे 11.35 वाजता बस दहानू तालुक्यातील धनिवारी येथील हॉटेल तुलसी येथे थांबली असता, त्यांच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगमधून अंदाजे 2,38,800 रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवासी व संशयितांची तपासणी केली. तपासादरम्यान शिव नागराज कवाडिया (रा. सूरत), तसेच कार्तिक सुरेश नायडू, विक्रम गर्गुट्टू नायडू व रमेश सुरेश नायडू (सर्व रा. नवापूर, जि. नंदुरबार) यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील तसेच पोलीस कर्मचारी संदीप चव्हाण, जाधव, धंगरा, गंगुर्दे आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या घटनेमुळे प्रवाशांनी आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button