पालघर पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम; ‘GOOD SAMARITAN’ ॲपबाबत विशेष कार्यशाळा संपन्न

पालघर पोलीस दल यांच्या वतीने रस्ते अपघातातील जखमींना वेळेत मदत मिळावी आणि “गोल्डन अवर”मध्ये तात्काळ वैद्यकीय उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने “GOOD SAMARITAN” ॲप व प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ११ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.
ही कार्यशाळा यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल व्हटकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमामध्ये रस्ते अपघातानंतर जखमींना तातडीने मदत कशी करावी, प्रथमोपचाराची मूलभूत माहिती आणि “GOOD SAMARITAN” ॲपचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत Maharashtra Emergency Medical Services (MEMS) च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यामध्ये डॉ. मंगेश चव्हाण, डॉ. लक्ष्मण जाधव, डॉ. अमित वाडे, डॉ. नवीन गिरी आणि डॉ. मनरक यांनी अपघातानंतरचा प्रथम प्रतिसाद, मूलभूत जीवनरक्षक पद्धती (BLS), त्वरित रुग्णवाहिका सेवा उपलब्धता आणि जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या प्रक्रियेबाबत सखोल माहिती दिली.
कार्यशाळेदरम्यान उपस्थित सर्वांनी “GOOD SAMARITAN” ॲप डाउनलोड करून त्याचा वापर प्रत्यक्ष समजून घेतला. या कार्यक्रमास १०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी, रस्ता अपघात नियंत्रण समितीचे सदस्य, MEMS टीम तसेच जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या ॲपबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर माहिती प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्याची भावना निर्माण होत असून, वेळेत प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
रस्ते अपघातांमध्ये “Golden Hour” अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा वेळी त्वरित मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे पालघर पोलीस दलाचा हा “GOOD SAMARITAN” उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अपघातग्रस्तांना नवजीवन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नागरिकांकडून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.

https://apps.apple.com/in/app/good-samaritan-mh-108/id6739282803

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button