
.पालघर |
पालघर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका सराईत वाहनचोराला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे बोईसर परिसरातील वाहनचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पालघर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
दि. २४ एप्रिल २०२६ रोजी बोईसर पूर्व येथील दांडीपाडा परिसरात फिर्यादी मयंक राजेश यादव यांनी आपली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH-48/BY-4191) रेल्वे ब्रिजजवळ पार्क करून ठेवली होती. मात्र काही तासांतच अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बोईसर पोलीस ठाण्याची विशेष तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ४८) हा या चोरीप्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असून सध्या बोईसर येथे वास्तव्यास होता. पोलिसांनी ११ मे २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून ठाणे शहर, मिरा-भाईंदर वसई-विरार आणि मुंबई परिसरात त्याच्यावर चोरी व जबरी चोरीचे तब्बल १६ गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, सपोनि योगेश शिंदे, पोउनि गोरखनाथ राठोड तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पालघर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.