पालघर जिल्ह्यात स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना (शिंदे गट)चा धडक मोर्चा; २२ जून रोजी एमएसईबी कार्यालयावर शक्तिप्रदर्शन

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता पाचबत्ती येथील हुतात्मा स्तंभ, पालघर येथून होणार असून, तेथून मोर्चेकरी थेट एमएसईबी जिल्हा कार्यालयावर धडक देणार आहेत. स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवत नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता असून, अनेक ठिकाणी नागरिकांकडून याला विरोध होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने आणि महावितरण प्रशासनाने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या मोर्चामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने वीज ग्राहक आणि नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पालघर शहरात मोर्चादरम्यान वाहतुकीत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता राजकीय वातावरण तापू लागले असून, २२ जून रोजीच्या या मोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शासन व महावितरण प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button