राहुल गांधींच्या साधेपणाने पालघर काँग्रेस जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांचे कुटुंब भारावले

पालघर | प्रतिनिधी

पवार कुटुंबाच्या विवाह सोहळ्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकसभा खासदार राहुल गांधी यांची पालघर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्याशी झालेली भेट विशेष चर्चेचा विषय ठरली. या भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी दाखविलेला साधेपणा, आपुलकी आणि नम्र स्वभाव उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
विवाह सोहळ्याच्या गडबडीतही राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला. याच वेळी कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हा क्षण आणखी खास ठरला, जेव्हा राहुल गांधी यांना समजले की ठाकूर यांच्यासोबत त्यांची पत्नी आकांक्षा ठाकूर देखील उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांनी अत्यंत सहजतेने आणि प्रेमळ स्वभावाने आकांक्षा यांना जवळ बोलावून त्यांच्याशी काही क्षण मनमोकळा व हलकाफुलका संवाद साधला.
या अनपेक्षित आणि आत्मीय संवादामुळे आकांक्षा ठाकूर भारावून गेल्या. देशातील एका प्रमुख राजकीय नेत्याने कौटुंबिक सोहळ्यात दाखविलेली ही आपुलकी आणि आदरयुक्त वागणूक ठाकूर कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरली.
कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी या भेटीबाबत भावना व्यक्त करताना सांगितले, “राहुलजींनी अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीने आकांक्षाशी संवाद साधला. देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्याची ही नम्रता आणि जिव्हाळा मनाला स्पर्शून जाणारा होता. नेतृत्वासोबतच माणुसकी जपणारे राहुलजी यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. त्यांच्याशी झालेली ही भेट आमच्या कुटुंबासाठी कायम स्मरणात राहणारी आहे.”
राहुल गांधी यांचे सहज वागणे, लोकांशी जोडून घेण्याची त्यांची शैली आणि प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटण्याची त्यांची वृत्ती याचा सकारात्मक अनुभव उपस्थितांनाही आला. या भेटीनंतर कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांच्या कुटुंबाप्रती दाखविलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल आभार मानले आहेत.
या विशेष भेटीमुळे पालघर काँग्रेसच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्या साधेपणाची, नम्रतेची आणि जनसामान्यांशी असलेल्या जवळिकीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button