
पालघर | प्रतिनिधी
पालघर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदर्श नगर, पिलेना नगर, वीरेंद्र नगर, गोठणपूर, वाघुळसार, वाघोबा घाट आणि आंबेडकर नगर (पालघर पूर्व) आदी भागांतील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे घरगुती साहित्य, अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचे नुकसान झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी प्रांत अधिकारी, पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तलाठी तसेच तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पूरग्रस्त भागांची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली. तलाठीमार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमांनुसार लवकरात लवकर आर्थिक मदत व आवश्यक दिलासा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
दरम्यान, रिपाईच्या वतीने पिलेना नगर परिसरात पूरग्रस्त नागरिकांना बिस्किटे व खाऊचे वाटप करून तातडीची मदत करण्यात आली. या मदतकार्यामध्ये पालघर शहर संघटक राजू शेख, शाहीन शेख, अंकिता जाधव, दिपेश गायकवाड आणि छाया शिनवारी यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना धीर देत आवश्यक मदत पोहोचवली.
पूरग्रस्त नागरिकांना तातडीची शासकीय मदत मिळावी आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.