
पालघर | प्रतिनिधी
धापशी पाडा व गणेश नगर परिसरातील पूरबाधित कुटुंबांना तातडीचा दिलासा; डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त ‘अंत्योदय’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकी
पालघर शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले, तर अनेक कुटुंबांना अन्न शिजविणेही शक्य झाले नाही. अशा कठीण परिस्थितीत भारतीय जनता पार्टी, पालघर शहर मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत ४०० अन्नपाकिटांचे वितरण केले.
दि. ६ जुलै रोजी भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पालघर शहर मंडळाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. मुसळधार पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली. याच वेळी डॉ. मुखर्जी यांच्या ‘अंत्योदय’ अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याच्या विचारातून प्रेरणा घेत शहर मंडळाचे अध्यक्ष अॅड. जयेश रघुनाथ आव्हाड यांनी पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शहर मंडळाचे दोन्ही सरचिटणीस, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालघर (पूर्व) येथील धापशी पाडा आणि गणेश नगर या पूरग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. ज्या कुटुंबांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते आणि ज्यांच्या घरातील चूल पेटली नव्हती, अशा गरजू कुटुंबांना ४०० अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले.
ऐन संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे अनेक पूरग्रस्त कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला. स्थानिक नागरिकांनी या मदतकार्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत सामाजिक उत्तरदायित्वाचे कौतुक केले.
या उपक्रमातून संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देण्यात आला. भविष्यातही शहरातील गरजू, आपत्तीग्रस्त आणि संकटग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी भाजपा पालघर शहर मंडळ सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
