रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन हाय अलर्ट; नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज

पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यापक तयारी केली असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा परिषद, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पाणीपुरवठा, आरोग्य, पुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षण, महसूल तसेच इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्व विभागांनी आपापल्या तयारीचा अहवाल सादर केला असून, नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा अखंडितपणे मिळतील यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
महावितरणला रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बचाव केंद्रे आणि महत्त्वाच्या सेवांना प्राधान्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळे येऊ नयेत यासाठी कम्युनिकेशन टॉवरच्या वीजपुरवठ्यावरही विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेला बंद पडलेले रस्ते तातडीने सुरू करणे, पाणी साचलेल्या मार्गांची साफसफाई करणे, पडलेली झाडे हटविणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पीएमजीएसवाय आणि सीएमजीएसवाय अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांवर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे.
आरोग्य विभागाने जलजन्य आणि साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी आवश्यक औषधसाठा, जंतुनाशके, लसीकरण साहित्य तसेच अँटी स्नेक व्हेनम (ASV) उपलब्ध ठेवले असल्याची माहिती दिली. पावसानंतर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यावरही भर देण्यात आला आहे.
पुरवठा विभागाने जिल्ह्यात पुरेसा धान्यसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले असून, बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
पालघर आणि डहाणू नगर परिषदांना शहरातील स्ट्रॉम वॉटर ड्रेनची साफसफाई, अडथळे दूर करणे आणि शहरी पूरस्थिती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना घरांचे, शेतीचे तसेच पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छिमारांच्या नुकसानीचेही सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना मदत देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, बचाव केंद्रांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा उपलब्ध राहतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे.”
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व विभागांमध्ये समन्वयाने काम सुरू असल्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button