
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील दहाणू तालुक्यातील दांडी गावचा उदयोन्मुख क्रिकेटपटू तनवीस वझे याची युगांडा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या तनवीसच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून तनवीस क्रिकेटमध्ये सातत्याने मेहनत घेत असून त्याने अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 या विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याने मुंबई राज्य संघाकडून अनेक सामने खेळले असून, युनायटेड किंग्डम (यूके) मध्ये क्लब क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत युगांडा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात त्याची निवड करण्यात आली आहे.
या यशानिमित्त तनवीस वझे याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच रामराज ग्रुपचे संस्थापक कॅप्टन सत्यम ठाकूर यांचे विशेष आभार मानले. यावेळी कॅप्टन ठाकूर यांनी तनवीसला संपूर्ण क्रिकेट किट भेट देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॅप्टन सत्यम ठाकूर म्हणाले, “ग्रामीण भागातून कठोर परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तनवीस वझे याने पालघर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी आम्ही नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहू.”
तनवीस वझेच्या या उल्लेखनीय यशामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळणार असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.