
पालघर | विशेष प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात पालघर पोलिसांनी मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत चार वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ₹३८,४३,८६६ किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चार वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत चार आरोपींना अटक, एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार १६ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विशेष गस्त व सापळा कारवाई राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाणे हद्दीत दोन, मनोर पोलीस ठाणे हद्दीत एक आणि कासा पोलीस ठाणे हद्दीत एक अशा एकूण चार ठिकाणी ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान तलासरी पोलीस ठाण्याच्या पहिल्या प्रकरणात एमएच-०६/एबी-५४६५ क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून गुटख्याची वाहतूक करताना ₹१२.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी यशवंत जयराम सिंह (रा. पवई, मुंबई) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
तलासरीतील दुसऱ्या कारवाईत एमएच-०३/ईएस-९८५३ क्रमांकाच्या वॅगनआर कारमधून ₹७.७६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात सलीम इस्त्याकअली शाह (वय ३३, गोवंडी) आणि आफताब आलम अब्दुलनईम अन्सारी (वय २६, गोवंडी) या दोघांना अटक करण्यात आली.
मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची चाहूल लागताच आरोपी वाहन सोडून फरार झाला. घटनास्थळावरून एमएच-४३/सीपी-५०२६ क्रमांकाची वॅगनआर कार आणि ₹९.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमएच-४७/क्यू-२९३६ क्रमांकाच्या मारुती सुझुकी बॅलेनोमधून ₹८.२९ लाखांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुनिलकुमार बेहेराजी गुप्ता (वय २४, गोवंडी, मुंबई) याला अटक करण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव (डहाणू), उमेश गवळी (पालघर) आणि समीर महेर (जव्हार) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरीचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, कासाचे पोलीस निरीक्षक अमर पाटील, मनोरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे तसेच त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.
या धडक कारवाईमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत असून, अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पुढेही कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पालघर पोलिसांनी दिला आहे.

