
पालघर | प्रतिनिधी
कर्जमाफीसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून, जिल्ह्यातील सुमारे १० हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत थकीत राहिलेले आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेले पात्र पीक कर्ज योजनेच्या निकषांनुसार कर्जमाफीसाठी विचारात घेतले जाणार आहे. यासाठी संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
गावपातळीवर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध
पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर तसेच संबंधित उपनिबंधक (DDR) कार्यालये आणि सहकारी संस्थांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीमध्ये नावाबाबत किंवा कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने तहसीलदार कार्यालय किंवा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आधार प्रमाणीकरण न झाल्यास लाभाच्या प्रक्रियेत अडथळा
योजनेचा लाभ पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण (e-KYC) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण प्रलंबित राहिल्यास लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन
कर्जमुक्ती योजनेसोबतच शासनाने नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांत घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक अर्ज व प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून पात्रतेनुसार प्रोत्साहन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करता येईल.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्क
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर हेल्पडेस्क सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित प्रशासन, तहसीलदार कार्यालय, DDR कार्यालय किंवा हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.
पात्र शेतकरी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे.