
पालघर | प्रतिनिधी
महसूल विभाग हा केवळ महसूल वसुली करणारा विभाग नसून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाला गती देणारा, जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारा आणि आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणारा लोकाभिमुख विभाग बनला आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
महसूल दिन आणि पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके, भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणार्थी पी. व्ही. अमल, उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, विजया जाधव, तेजस चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. जाखड यांनी सांगितले की, १ ऑगस्ट २००२ पासून महसूल दिन साजरा करण्यामागील उद्देश महसूल विभाग अधिकाधिक नागरिकाभिमुख करणे हा आहे. स्वातंत्र्यानंतर महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीत मोठे परिवर्तन झाले असून आज महसूल विभाग महसूल संकलनाबरोबरच विकास, जनकल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत आहे.
गेल्या वर्षभरात सातबारा उताऱ्यावरील हक्क सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात येत असून हा महसूल विभागासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.
महसूल विभाग कृषी, ग्रामविकास, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी यांसह विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत असून, पालघर जिल्ह्यात बहुतांश शासकीय विभाग एकाच प्रशासकीय इमारतीत कार्यरत असल्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा वेग वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या काळात महसूल विभागाने विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनातील महसूल विभागाचे योगदान अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, ‘सर्वांसाठी घरे’ अभियान, तसेच २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण यांसारख्या निर्णयांमधून शासनाचा नागरिकाभिमुख दृष्टिकोन स्पष्ट होत असल्याचे नमूद करत, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पालघर ठरणार विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’
पालघर जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाविषयी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. जाखड म्हणाल्या की, मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेल्या संकल्पनेनुसार पुढील पाच ते दहा वर्षांत पालघर जिल्हा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळणार असून हा विकास शाश्वत आणि लोककेंद्रित करण्यासाठी प्रशासन प्राधान्याने कार्य करणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच पालघर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.