
पालघर | प्रतिनिधी
निशा सांबर यांचाही विशेष सन्मान; गुणवंतांच्या कामगिरीला शासनाची दाद
पालघर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-२०१२ अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या वतीने सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन गुणवंत खेळाडूंसह दोन क्रीडा मार्गदर्शकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, इयान सबीनो लोपिस यांची बॅडमिंटन क्रीडा प्रकारासाठी सन २०२४-२५ च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कुमारी साना पीटर गोन्सालविस यांची बॉक्सिंगसाठी सन २०२४-२५, तर कु. देव जतिन रुपारेलिया यांची बॅडमिंटनसाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
खेळाडू घडविणाऱ्या मार्गदर्शकांचाही गौरव
क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांची कारकीर्द घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे. भीमराव गवई यांची बॅडमिंटनसाठी सन २०२४-२५, तर प्रसाद पाटील यांची ॲथलेटिक्ससाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
निशा सांबर यांचा विशेष सन्मान
याशिवाय, झारखंड येथे झालेल्या पहिल्या ‘आदिवासी खेलो इंडिया’ स्पर्धेत ४×१०० मीटर रिले आणि ४×४०० मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या कु. निशा सांबर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक
पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक असे आहे. राज्याच्या क्रीडा धोरणानुसार, जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू तसेच त्यांना घडविणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांना आगामी काळात आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यातून बॅडमिंटन, बॉक्सिंग, ॲथलेटिक्स यांसह विविध क्रीडा प्रकारांमध्ये नवोदित खेळाडू पुढे येत आहेत. गुणवंत खेळाडू आणि प्रशिक्षकांचा अशा प्रकारे सन्मान झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, पालघरमधून भविष्यात आणखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुरस्कारार्थींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या यशामुळे पालघरच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार आहे.
