पालघर पोलिसांची त्रिसूत्री जनजागृती; सायबर फसवणूक, अमली पदार्थ आणि वाहतूक नियमांवर ५०० नागरिकांना मार्गदर्शन

पालघर | प्रतिनिधी

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, तरुणाईतील अमली पदार्थांचे वाढते आकर्षण आणि रस्ते अपघातांचे गंभीर आव्हान लक्षात घेऊन पालघर पोलीस दलाच्या वतीने सायबर गुन्हे, अमली पदार्थविरोधी जनजागृती आणि वाहतूक नियम या विषयांवर विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही कार्यशाळा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.

पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक निशा सोनवणे, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि अनिल व्हटकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोउपनि समीर भोसले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नागरिक, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकारांसह सुमारे ५०० नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली.
फेक लिंक, OTP आणि ‘डिजिटल अरेस्ट’पासून सावध राहण्याचे आवाहन
सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन पद्धतींबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. फेक लिंक, OTP व UPI फसवणूक, बनावट सोशल मीडिया अकाउंट, KYCच्या नावाखाली होणारी फसवणूक, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ यांसारख्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे पोलिसांनी आवाहन केले.

सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अमली पदार्थमुक्त समाजासाठी सामूहिक सहभागाची गरज
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, तसेच अमली पदार्थविरोधी लढ्यात पालक, शिक्षक, नागरिक आणि समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
वाहतूक नियमांचे पालन हाच अपघात टाळण्याचा मार्ग
रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट लावणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वेगमर्यादेचे पालन करणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस-कम्युनिटी सहभागावर भर
सायबर सुरक्षितता, अमली पदार्थमुक्त समाज आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी परस्पर सहकार्याने काम करण्याची गरज या कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आली. केवळ पोलिसांच्या कारवाईने नव्हे, तर नागरिकांच्या जागरूकतेमुळेही अनेक गुन्हे आणि अपघात टाळता येऊ शकतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या जनजागृती कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी अनिल व्हटकर, सपोनि खटावकर, पोउपनि समीर भोसले, मपोअं स्नेहल शेलार, पोअं रोहित तोरस्कर आणि पोअं आकाश गिड्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सायबर फसवणुकीपासून सावधगिरी, अमली पदार्थांना ठाम नकार आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन—या त्रिसूत्रीचा संदेश पालघर पोलिसांनी ५०० नागरिकांपर्यंत पोहोचवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button