चारोटी पोलिसांकडून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडेवाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन; १५० ते २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

महालक्ष्मी, पालघर | प्रतिनिधी

रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने म.पो. केंद्र चारोटीच्या वतीने शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी विव्हळवेढे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, महालक्ष्मी येथे विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या सुमारे १५० ते २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
विना परवाना वाहन चालवू नका
कार्यक्रमात विना परवाना वाहन चालवणे टाळावे तसेच १८ वर्षांखालील मुलांनी मोटार वाहन चालवू नये, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला. मोटारसायकलवर प्रवास करताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असून ट्रिपल सीट प्रवास करणे धोकादायक असल्याचेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

मोबाईल, इयरफोनपासून सावध राहण्याचे आवाहन
रस्ता ओलांडताना शक्यतो झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. रस्ता ओलांडताना मोबाईल फोनचा वापर करू नये तसेच कानात इयरफोन लावून रस्ता ओलांडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास चालकाचे लक्ष विचलित होऊन गंभीर अपघात होऊ शकतो, याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
लाल, पिवळा आणि हिरवा दिवा काय सांगतो?
वाहतूक सिग्नलचे विविध प्रकार तसेच लाल, पिवळा आणि हिरवा दिवा यांचा अर्थ विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आला. वाहतुकीचे नियम हे केवळ वाहनचालकांसाठी नसून पादचारी आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून वाहतूक नियमांबाबत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. पोलिसांच्या या उपक्रमाला शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सपोनि अमोल जाधव, प्रभारी अधिकारी, म.पो. केंद्र चारोटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चार पोलीस अंमलदार, शाळेतील शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
“विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी स्वतः वाहतूक नियमांचे पालन करण्यासोबतच आपल्या कुटुंबीयांनाही नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
चारोटी पोलिसांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार असून, अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button