बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार करून दरोडा; पालघर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ५१ लाख ५१ हजार १५० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

डहाणू | प्रतिनिधी
डहाणू शहरातील इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गंभीर दरोडा प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे ४२८.०५० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे डहाणू परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बंदुकीचा धाक दाखवत गोळीबार
न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये तीन तोंड बांधलेले आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले इसम शिरले. त्यांनी दुकानदार विनय कैलास सोनी यांना बंदुकीचा धाक दाखवला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न होताच आरोपींपैकी एकाने दुकानदाराच्या दिशेने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोखंडी सुऱ्याच्या सहाय्याने दुकानातील काचा फोडून सोन्याचे दागिने व इमिटेशन ज्वेलरी जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.
या घटनेप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमांनुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपी जाळ्यात
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा, डहाणू पोलीस आणि सायबर पोलिसांची विशेष पथके तयार केली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विविध तपास पद्धतींच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान यशवंत सदु चौधरी (४०) याला २७ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे दिपेश यशवंत गवळी (२२) आणि विशाल धाक्या चौरे (२३) या दोघांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
५१ लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत
आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे, जप्त करण्यात आले. या प्रकरणात पुढील तपासादरम्यान बीएनएस कलम ६१(२) व २३८ वाढीव करण्यात आले असून, दरोड्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई चंद्रकिशोर मीना, पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा पालघर, डहाणू पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कारवाईमुळे धाडसी दरोड्याचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले असून, पोलिसांच्या तपास यंत्रणेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.