
पालघर | प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांचे वाढते स्वरूप लक्षात घेता नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर २०२६ हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातही विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या मोहिमेची माहिती देताना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सायबर सुरक्षेच्या मूलभूत नियमांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या मोहिमेदरम्यान पालघर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, बँका, व्यापारी आस्थापना तसेच विविध सामाजिक ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता आणि संभाव्य ऑनलाइन धोके याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून सावधगिरीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने तक्रार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी विलंब न करता सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवता येते.
पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नागरिकांनी सायबर जनजागृतीच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच आपल्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.”
सायबर गुन्हे रोखण्यासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सजग आणि सतर्क राहणे गरजेचे आहे. ‘सावधान नागरिक, सुरक्षित डिजिटल व्यवहार’ या भावनेतून पालघर पोलिसांच्या या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.