३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान १७ वर्षांखालील शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन; राज्यभरातील युवा खेळाडूंचा सहभाग

पालघर | विशेष प्रतिनिधी
कॉर्लिनी मैदानावर रंगणार धावण्यासह विविध मैदानी स्पर्धांचा थरार; ‘वेगवान धावपटू’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कारांचे विशेष आकर्षण
पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा २०२६ यंदा बोईसर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील युवा खेळाडूंच्या कौशल्याचा, वेगाचा आणि सामर्थ्याचा रोमांचक आविष्कार ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान बोईसर येथील TAPS ३ व ४ परिसरातील कॉर्लिनी मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेमुळे पुढील तीन दिवस बोईसरचे क्रीडांगण राज्यातील युवा खेळाडूंच्या उत्साहाने आणि क्रीडाप्रेमींच्या जल्लोषाने गजबजणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेले १७ वर्षांखालील मुला-मुलींचे प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, विविध मैदानी क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
‘फास्टेस्ट रनर’ आणि ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्कार ठरणार मुख्य आकर्षण!
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मुला-मुलींसाठी स्वतंत्रपणे देण्यात येणारे ‘वेगवान धावपटू’ (Fastest Runner) आणि ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ (Best Athlete) पुरस्कार. धावण्याच्या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम वेगाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘फास्टेस्ट रनर’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, तर विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘बेस्ट ॲथलिट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांसाठी मुला-मुलींचे स्वतंत्र गट निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वेगवान धावपटूंना आकर्षक ट्रॅक सूट, तर सर्वोत्कृष्ट खेळाडूंना सायकल देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये पुरस्कार पटकावण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. इंदूराणी जाखड आणि मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना, पालघर जिल्हा ॲथलेटिक्स संघटना, पालघर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ तसेच पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटना यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे.
डॉन बॉस्को शाळेत खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था
राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी आयोजकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. सहभागी खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था बोईसर येथील डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या कालावधीत खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
युवा खेळाडूंसाठी राज्यस्तरीय संधी; पालघरच्या क्रीडा वैभवात भर
शालेय जीवनातच खेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांना राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने अशा स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. या स्पर्धांमधून ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळणार असून, त्यांच्यातील शिस्त, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद पालघर जिल्ह्याला मिळणे ही जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या आयोजनामुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळण्यासोबतच स्थानिक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनाही राज्यस्तरीय स्पर्धांचा अनुभव घेता येणार आहे.
पालघरकरांनो, युवा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर या!
राज्याच्या विविध जिल्ह्यांतून येणाऱ्या युवा खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण कामगिरीचा आनंद घेण्याची संधी पालघरकरांना मिळणार आहे. त्यामुळे पालघर आणि बोईसर परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच विविध क्रीडा संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
वेग, जिद्द, संघर्ष आणि विजयाचा जल्लोष अनुभवण्यासाठी बोईसर सज्ज झाले आहे. ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान TAPS कॉर्लिनी मैदानावर रंगणाऱ्या या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांकडे संपूर्ण पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.